सोमवार, डिसेंबर १६, २०१३

द्वंद्व

                                  क्षणाक्षणाला आपल्या मनात एक द्वंद्व सुरु असतं . .  चूक विरुद्ध बरोबर,चांगलं विरुद्ध वाईट ,अपेक्षित  विरुद्ध अनपेक्षित ,सत्य विरुद्ध असत्य ,हवंसं विरुद्ध नकोसं आणि  बरच काही …… पण मुळात हे द्वंद्व निर्माणच का व्हावं ?आपल्याच निर्णयावर फेरविचार सुरु केला की ह्याला सुरुवात होते . जे आहे ते जसच्या तसं स्वीकारलं ना ,आपल्या निर्णयावर जर आपण ठाम राहिलो न तर हा प्रश्नच उद्भवणार नाही कदाचित . पण बरेचदा आपण आपल्याच निर्णयावर फेरविचार करू लागतो आणि ह्या चक्रात अडकत जातो.  .आता आता पर्यंत बरोबर वाटणारी आपली किंवा समोरच्याची बाजू क्षणात चुकीची ठरवून मोकळं  होतो. काही गोष्टी जास्त विचार न करता केलेल्याच चांगल्या . कधी कधी अतिविचार हि बाधक ठरतो . अति विचार करून,समोरच्याची हि बाजू समजून घेण्याच्या नादात आपण अनपेक्षितरीत्या (कि अपेक्षितरित्या?) आपला निर्णय बदलतो . बरेचदा समोरच्या माणसासाठी . …… पण खरंच त्याने आपल्याला आनंद मिळतो का?
          आयुष्यात कधी न कधी मनाच्या एका कोपऱ्यात साठवलेली हि जखम पुन्हा ठसठसते . हो -नाही च्या हिंदोळ्यावर सतत झुलत राहिलं तर एखादा अपघात तर निश्चितच . या द्वंद्वात आपण कोणतीही बाजू घेतली न तरी पराजय हा आपलाच असतो . समोरच्याच्या बाजूने निर्णय घेतला कि तात्पुरता आनंद मिळतो . काहीतरी महान ,उदात्त केल्याचं समाधानही मिळतं . पण तात्पुरताच .समोरचा आपल्या निर्णयाने सुखावातोही . पण आपलं मन मारून समोरच्याला जिंक्वल्याच अप्रूप ओसरलं कि आपल्याला आपलाच राग येऊ लागतो . पश्चात्तापाचे  उमाळे येऊ लागतात . पण वेळ तर निघून गेलेली असते . कधी कधी आपल्या निर्णयावर ठाम राहूनही पश्चात्तापाची पाळी येते . कारण आपली बाजू समजून नाही घेतली म्हणून  समोरचा आधीच आपल्यापासून दूर झालेला असतो. शेवटी काय तर फेराविचाराच्या या द्वंद्वात चक्रव्युहात बळी गेलेल्या अभिमान्युसारखी अवस्था होते आपली . म्हणून कधी कधी आयुष्यात काही  गोष्टी  अति विचार न करताच  केल्या ना  तर फायद्याचं  ठरतं . 
                                      

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा