सोमवार, डिसेंबर ३०, २०१३

अपेक्षा

                          एखाद्याकडून अपेक्षा करणं चूक  कि बरोबर?नात्यामध्ये एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादू  नये ,कसलीही अपेक्षा न करता समोरच्यावर निखळ ,निर्व्याज्य प्रेम करावं असं  सहसा म्हटलं जातं . पण खरंच आपल्या रोजच्या जीवनात शक्य होतं का हे सर्व ?फळाची कसलीही अपेक्षा न करता आपण आपलं कर्म करत जावं ,असं श्रीकृष्णाने म्हटलंय गीतेत . पण खरंच वागतो का आपण असे ?हे सर्व आदर्श झालं हो . पण आपणा सामन्यांसाठी असतात का हे असले आदर्श ????
                             अपेक्षा  …………. मग नातं कुठलंही असो अपेक्षा या असतातच . मग समोरच्याकडून या नात्याबद्दल काही अपेक्षा धरणं चांगलं कि वाईट ?आई -वडील ,पालक आणि मुलं ,मित्र -मैत्रीण ,नवरा -बायको या सर्वच नात्यांत अपेक्षा असतात . आणि काही अंशी त्या रास्तही धरल्या जातात . 
                           माझ्या मते एखाद्याकडून काही अपेक्षा करणं चूक न्हवे . म्हणजे आपल्या माणसाकडून प्रेमाची ,आपलेपणाची अपेक्षा करण्यात कसली आलेय चूक ?आपण जर एखाद्याची काळजी करतोय ,त्याला जीवापाड जपतोय तर त्या माणसाकडून दोन प्रेमाच्या ,आपुलकीच्या शब्दांची परतफेड व्हावी अशी इच्छा करणं काही गैर नाही . नातं हि टू वे प्रोसेस असायला हवी . निदान भावनांच्या बाबतीत तरी . मग आपण जर काही देत असू तर समोरूनही तितकंच यावं हे अपेक्षित नाही ,पण त्याची सुरुवात तरी दिसावी . इतकंच . अपेक्षा करणं काही चूक नाही पण हा,या अपेक्षा अवाजवी असता कामा नयेत . अपेक्षा कराव्यात पण त्या अपेक्षांची किंमत ते नातं असू नये इतकंच …… 
                                       -मानसी ब्रीद



शुक्रवार, डिसेंबर २७, २०१३

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी ......


काल रात्री WHATSAPP वर आलेला एक अप्रतिम MESSAGE  ……


                                                                   सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी 

                 आयुष्य छान आहे ,थोडे लहान आहे 
                 रडतोस काय वेड्या ?लढण्यात शान आहे 
                 अश्रूच यार माझा मदिरेसमान आहे  
                 काट्यातही फुलांची झुलती कमान आहे 
                 उचलून घे हवे ते ,दुनिया दुकान आहे 
                 जगणे निरर्थ म्हणतो ,तो बेइमान आहे
              
                 "सुखासाठी कधी हसावं  लागतं तर कधी रडावं लागतं ,कारण  सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं ……. "


         

सोमवार, डिसेंबर १६, २०१३

द्वंद्व

                                  क्षणाक्षणाला आपल्या मनात एक द्वंद्व सुरु असतं . .  चूक विरुद्ध बरोबर,चांगलं विरुद्ध वाईट ,अपेक्षित  विरुद्ध अनपेक्षित ,सत्य विरुद्ध असत्य ,हवंसं विरुद्ध नकोसं आणि  बरच काही …… पण मुळात हे द्वंद्व निर्माणच का व्हावं ?आपल्याच निर्णयावर फेरविचार सुरु केला की ह्याला सुरुवात होते . जे आहे ते जसच्या तसं स्वीकारलं ना ,आपल्या निर्णयावर जर आपण ठाम राहिलो न तर हा प्रश्नच उद्भवणार नाही कदाचित . पण बरेचदा आपण आपल्याच निर्णयावर फेरविचार करू लागतो आणि ह्या चक्रात अडकत जातो.  .आता आता पर्यंत बरोबर वाटणारी आपली किंवा समोरच्याची बाजू क्षणात चुकीची ठरवून मोकळं  होतो. काही गोष्टी जास्त विचार न करता केलेल्याच चांगल्या . कधी कधी अतिविचार हि बाधक ठरतो . अति विचार करून,समोरच्याची हि बाजू समजून घेण्याच्या नादात आपण अनपेक्षितरीत्या (कि अपेक्षितरित्या?) आपला निर्णय बदलतो . बरेचदा समोरच्या माणसासाठी . …… पण खरंच त्याने आपल्याला आनंद मिळतो का?
          आयुष्यात कधी न कधी मनाच्या एका कोपऱ्यात साठवलेली हि जखम पुन्हा ठसठसते . हो -नाही च्या हिंदोळ्यावर सतत झुलत राहिलं तर एखादा अपघात तर निश्चितच . या द्वंद्वात आपण कोणतीही बाजू घेतली न तरी पराजय हा आपलाच असतो . समोरच्याच्या बाजूने निर्णय घेतला कि तात्पुरता आनंद मिळतो . काहीतरी महान ,उदात्त केल्याचं समाधानही मिळतं . पण तात्पुरताच .समोरचा आपल्या निर्णयाने सुखावातोही . पण आपलं मन मारून समोरच्याला जिंक्वल्याच अप्रूप ओसरलं कि आपल्याला आपलाच राग येऊ लागतो . पश्चात्तापाचे  उमाळे येऊ लागतात . पण वेळ तर निघून गेलेली असते . कधी कधी आपल्या निर्णयावर ठाम राहूनही पश्चात्तापाची पाळी येते . कारण आपली बाजू समजून नाही घेतली म्हणून  समोरचा आधीच आपल्यापासून दूर झालेला असतो. शेवटी काय तर फेराविचाराच्या या द्वंद्वात चक्रव्युहात बळी गेलेल्या अभिमान्युसारखी अवस्था होते आपली . म्हणून कधी कधी आयुष्यात काही  गोष्टी  अति विचार न करताच  केल्या ना  तर फायद्याचं  ठरतं .