रविवार, नोव्हेंबर २४, २०१३

नातं …

                                       

             नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं  नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू  दे,ते सहज असावे . नात्यातील  सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या  कदाचित आपल्याकडून  ही  हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …
             अशी  हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ  असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव ,श्रीमंतीचा बडेजाव,उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं ,नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही . 
                एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं  हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो . 
                आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!
                                                                  -मानसी ब्रीद 

शनिवार, नोव्हेंबर २३, २०१३



काही आवडलेलं ……… 

दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल

इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गूळपोळीच्या पोळ्या 

ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात 
चुरमुरयात तिखट-मीठ, पाणी घालून केलेली आमटी 

रिकाम्या कपातील चविष्ट चहा

तो आल्यागेल्याचा पाहुणचार 

दुखण्याखुपण्यावरील ते वैद्यांचे उपचार 
बाळाला न्हाऊ घालणे आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणे 
मांडवातील भांडणे आणि ते चट्ट्यामट्ट्याचे साखरपेरणे 
मांडलेली भातुकली अशी रंगतेअशी रंगते 
आणि केव्हा एकदा पेटारयात मिटून जाते 


                        कवयित्री : इंदिरा संत