रविवार, नोव्हेंबर २४, २०१३

नातं …

                                       

             नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं  नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू  दे,ते सहज असावे . नात्यातील  सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या  कदाचित आपल्याकडून  ही  हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …
             अशी  हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ  असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव ,श्रीमंतीचा बडेजाव,उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं ,नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही . 
                एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं  हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो . 
                आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!
                                                                  -मानसी ब्रीद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा